चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भांडणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या विवाहितेसह तिच्या आई, बहीण आणि भावाला सासरच्या मंडळींनी लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना साईनगर येथे घडली आहे. याप्रकरणी सोमवारी १६ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता पतीसह पाच जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मनीषा विनोद पवार (वय २८, रा. साईनगर, लांजे) यांचा त्यांच्या सासरच्या लोकांशी वाद झाला होता. याच वादाचा जाब विचारण्यासाठी मनीषा पवार या आपल्या आई, बहीण आणि भावासह पती विनोद नामदेव पवार यांच्या घरी गेल्या होत्या. यावेळी संतापलेल्या सासरच्या मंडळींनी जुन्या वादाचा राग मनात धरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यावेळी नामदेव पवार यांनी जवळच असलेली लाकडी काठी उचलून विवाहितेच्या आईच्या पाठीवर जोरात मारून दुखापत केली. जेव्हा विवाहितेची बहीण आणि भाऊ मध्यस्थी करण्यासाठी आले, तेव्हा त्यांनाही सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण केली. बेकायदेशीर मंडळी जमवून लाठ्या-काठ्यांनी विवाहितेच्या कुटुंबावर हल्ला चढवला. तसेच, “तुम्हाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकीही दिली. याप्रकरणी पती विनोद नामदेव पवार, सासरे नामदेव शंकर पवार, दीर हिलेश दुधमल पवार, चुलत जेठ रमेश उदा पवार आणि चुलत जेठ वाडीलाल दुधमल पवार (सर्व राहणार साईनगर, लांजे, ता. चाळीसगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



