अमळनेर (प्रतिनिधी) माहेरून ५० हजार रुपये आणावेत, यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणारा पती ,सासू व इतर ५ लोकांवर अमळनेर पोलिसात विविध कलमातर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रंजिता दीपक सपकाळे (वय ३२, रा प्रताप मिल कम्पाउंड, अमळनेर) यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे २००५ साली लग्न झाले. लग्नानंतर तुझ्या वडिलांनी लग्नात आमचा काहीही मानपान केला नाही. ह्यासाठी माहेरून ५० हजार रुपये आणावेत, यासाठी विवाहितेचा पती दीपक रमेश सपकाळे,सासू इंदूबाई रमेश सपकाळे,दीर प्रविण रमेश सपकाळे ,दिराणी पूनम प्रविण सपकाळे,नणंद नलिनी संजय अहिरे,सविता सैंदाने,कविता संदीप कांबळे हे नियमित शारीरिक व मानसिक छळ करीत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीने माहेरून ५० हजार रुपये आणून सासरच्यांना दिले. त्यांनंतर २ महिने वागणूक सुधारली. परंतु फिर्यादीची नणंद कविता कांबळे ही अधून मधून माहेरी येऊन घरात भांडण लावत होती. मुलबाळ होत नाही, असे सांगत शिवीगाळ व छळ करून परत ५० हजार रुपयांची मागणी करीत होते.
दि २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास थायराईडचा त्रास होत असल्यामुळे झोपली असतांना पती दीपक सपकाळे याने थायराईडच्या गोळ्या हातात घेऊन, त्या माझ्या तोंडात कोंबून तोंड दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न करून घराचा दरवाजा बाहेरून लावून बाहेर निघून गेला. त्यानंतर आपण घराचा दरवाजा ठोकत शेजारील लोकांकडे मदत मागितली. शेजाऱ्यांनी माझ्या नातेवाईकांना फोन लावून बोलवून घेतले. नातेवाईक शांताबाई मोरे,वैजताबाई जाधव हे आल्यानंतर डॉ. निखिल बहुगुने यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले, असे पिडीत विवाहितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात अमळनेर पोलिसात कलम ३०७,४९८अ,५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर करीत आहेत.