Home Cities जळगाव नागपूरमध्ये आरएसएस मुख्यालयावर मोर्चा; वंचित बहुजन आघाडीचा ‘निर्णायक लढा’चा एल्गार

नागपूरमध्ये आरएसएस मुख्यालयावर मोर्चा; वंचित बहुजन आघाडीचा ‘निर्णायक लढा’चा एल्गार


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथे वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत २३ मार्च रोजी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मुख्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाबाबत आक्रमक भूमिका जाहीर करण्यात आली. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनाला “निर्णायक लढा” असे संबोधत राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागपूरकडे रवाना होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

बैठकीदरम्यान विविध पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत देशहिताच्या मुद्द्यांवर आपली भूमिका ठामपणे मांडली. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करत, या सर्व विषयांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.

“हा केवळ मोर्चा नसून सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचा निर्णायक एल्गार आहे,” असा ठाम संदेश या बैठकीतून देण्यात आला. जनजागृतीच्या माध्यमातून गावागावांत पोहोचून मोठ्या प्रमाणावर जनसागर उभा करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यासाठी संघटनात्मक पातळीवर व्यापक नियोजन करण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली.

ही बैठक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी हरिश्चंद्र सोनवणे, प्रीतीलाल पवार, जितेंद्र भाऊ केदार, दिगंबर सोनवणे, प्रवीण सपकाळे, अमित तळवी, अनिल लोंढे, रवींद्र ब्राह्मणे, तांदळे साहेब, विनोद बेर भैया, गमीर शेख यांच्यासह जिल्हा, तालुका आणि महानगर स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound