Home राजकीय लाडकी बहीण योजनेचा मार्चचा हप्ता लांबणीवर; आता महिलांच्या खात्यात ३००० रुपये एकत्र...

लाडकी बहीण योजनेचा मार्चचा हप्ता लांबणीवर; आता महिलांच्या खात्यात ३००० रुपये एकत्र येणार?


मुंबई-वृत्तसंस्था । महाराष्ट्र राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्यातील कोट्यवधी महिलांना फेब्रुवारी महिन्यापर्यंतचे हप्ते प्राप्त झाले असले, तरी मार्च महिना संपूनही अद्याप हप्ता जमा न झाल्याने महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, आता प्राप्त माहितीनुसार मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, पात्र महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होऊ शकतात.

गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांचे गणित काहीसे विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता विलंबाने म्हणजेच मार्च महिन्यात वितरित करण्यात आला होता. त्यानंतर मार्चचा हप्तादेखील वेळेत न आल्याने लाभार्थी महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. यापूर्वी फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र येईल अशी आशा होती, मात्र महिलांच्या खात्यात केवळ १५०० रुपयेच जमा झाले होते. आता एप्रिल महिना सुरू झाला असून, शासन स्तरावर मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचा निधी एकत्रित वितरित करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.

योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ‘ई-केवायसी’ (e-KYC) प्रक्रियेबाबत सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अनेक महिलांच्या अर्जात त्रुटी असल्याने किंवा तांत्रिक कारणांमुळे त्यांचे हप्ते रोखले गेले आहेत. ही बाब लक्षात घेऊन सरकारने ई-केवायसीची मुदत तिसऱ्यांदा वाढवली आहे. आता महिलांना ३० एप्रिलपर्यंत आपल्या केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या महिलांनी अर्जात काही चुका केल्या आहेत किंवा ज्यांची बँक आधार जोडणी अपूर्ण आहे, त्यांना ही मुदतवाढ मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.

मात्र, दुसरीकडे एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे, या योजनेतून आतापर्यंत जवळपास ७१ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. अपात्रता, चुकीची माहिती किंवा वारंवार सांगूनही ई-केवायसी पूर्ण न करणे, ही यामागील मुख्य कारणे आहेत. ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत किंवा ज्यांनी विहित मुदतीत केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना यापुढील १५०० रुपयांचे लाभ मिळणार नाहीत. त्यामुळे केवळ पात्र आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करणाऱ्या महिलांच्याच खात्यात आगामी हप्ते जमा केले जाणार आहेत.

 

 


Protected Content

Play sound