मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनामुळे शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो मराठा बांधवांच्या उपस्थितीमुळे मुंबईतील प्रमुख रस्ते, रेल्वे स्थानके आणि महामार्गांवर प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आधीच गर्दी असलेल्या शहरात हे आंदोलन वाहतूक व्यवस्थेसाठी मोठं आव्हान बनलं आहे.
आझाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलनासाठी मराठवाडा, नाशिक, कोकण, विदर्भ अशा संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. अनेक ठिकाणी आंदोलकांनी वाहनांची रेलचेल केली असून, त्यामुळे ईस्टर्न फ्री वे, सायन-पनवेल हायवे, मानखुर्द भागात वाहनांची रांग लागलेली दिसून येत आहे. ईस्टर्न फ्री वेवर आंदोलनात सहभागी होणाऱ्या शेकडो वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे, तर ट्राफिक पोलीस ती कोंडी सोडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

रेल्वे सेवेलाही याचा परिणाम जाणवत असून, सीएसटीएम व चर्चगेट रेल्वे स्थानकांवर गर्दीचा प्रचंड उद्रेक झाला आहे. सीएसटीएमहून कल्याण आणि पनवेलकडे जाणाऱ्या लोकल गाड्या तुडुंब भरल्या असून, प्रवाशांना डब्यात चढण्यासाठीही जागा उरत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सरासरी १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी मुंबईतील काही मार्गांवर वाहतुकीसाठी निर्बंध लागू केले आहेत. वाशीहून येणाऱ्या साऊथ बाउंड पांजरपोळ फ्री वेकडे जाणारी वाहने, वीर जिजाबाई भोसले मार्गावरून ट्रॉम्बेकडे जाणारी वाहने, तसेच छेडानगरहून फ्री वेकडे वळणाऱ्या वाहनांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. प्रशासनाने वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
या आंदोलनामुळे गुगल मॅपवरील नकाशात दक्षिण मुंबईतील अनेक रस्ते लाल रंगात म्हणजे वाहतूक ठप्प झाल्याचे दर्शवले जात आहे. आंदोलनाच्या प्रभावामुळे सायन-पनवेल हायवेवरून येणाऱ्या बाहेरगावच्या वाहनांना वाशी रेल्वे स्थानकाजवळच थांबवले जात आहे आणि आंदोलक व प्रवाशांना रेल्वेने मुंबईमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.



