Home Cities जळगाव मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे : समता परिषदेची मागणी

मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे : समता परिषदेची मागणी

0
207

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  राज्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आंदोलनांनी आता नव्या वळणावर प्रवेश केला असून, ओबीसी समाजातून या निर्णयाला जोरदार विरोध होऊ लागला आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास हा सरळसरळ अन्याय ठरेल, असा ठाम सूर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने उपस्थित केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी सरकारने मराठा समाजासाठी वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी स्पष्ट मागणी केली आहे.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन देण्यात आले. आंदोलनकर्ते मराठा समाजासाठी थेट ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी करत आहेत, मात्र ही मागणी ओबीसी समाजासाठी अन्यायकारक ठरेल, असा दावा समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. निवेदनात म्हटले आहे की, सध्या मराठा समाजाला खुल्या गटातून SEBC, EWS आणि काही प्रकरणांत ‘कुणबी’ म्हणून आरक्षण मिळत आहे, आणि त्याचा लाभ देखील मराठा समाज घेत आहे.

तरीही आता ओबीसी कोट्यातूनच आरक्षण द्यावे, ही मागणी करत असल्याने ओबीसी समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. ओबीसी कोट्यातील ३७४ जातींना अल्प प्रमाणात मिळणाऱ्या आरक्षणाचा लाभ जर मराठा समाजालाही मिळाला, तर इतर मागास जातींसाठी आरक्षण हे केवळ नावापुरते उरेल, अशी तीव्र भावना या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, ओबीसी समाजाने पिढ्यान् पिढ्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा सामना केला आहे. आज मिळालेल्या मर्यादित आरक्षणाच्या आधारावरच त्या समाजातील तरुण शासकीय नोकऱ्या आणि शिक्षणात संधी शोधत आहेत. अशावेळी हा कोटा दुसऱ्या समाजाला हस्तांतरित केला गेला, तर ओबीसींवरील अन्याय अधिक वाढेल.

या पार्श्वभूमीवर समता परिषदेसह विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन हे निवेदन दिले असून, जर सरकारने ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिलेच, तर संपूर्ण राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर जिल्ह्यातील विविध जाती-जमातींचे, संघटनांचे आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे स्वाक्षरीसह समर्थन नोंदवले गेले आहे. निवेदनावर दिपक पंडीत माळी, संतोष बळीराम माळी, डॉ. सुनिल देवरे, संतोष पाटील, राजेंद्र चौधरी, रामू सैनी, गोकुळ महाजन, प्रशांत महाजन, विजय वानखडे, राजेंद्र विसपुते, धनराज माळी, किरण महाजन, चिंतामणी महाजन, संभाजी पाटील, रवींद्र जाधव, यश माळी, आदित्य माळी, अर्चना माळी, यशवंत शिंपी, सारिका शिंपी, प्रभाकर महाजन, राजेंद्र बारी, गंगाधर बागुल, चेतन शिंपी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत


Protected Content

Play sound