मुंबई-वृत्तसेवा | राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेत सर्व मागण्या मान्य केल्यामुळे राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. तर आता आंदोलक आपापल्या गावाच्या दिशेने परतू लागले आहेत.
गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज मोठा विजय झाला असून राज्य सरकारने जीआर काढण्यासह सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. हा निर्णय जाहीर झाल्यापासूनच राज्यभरातील समाजबांधवांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. मुंबईतील आंदोलकांनी तेथेच जोरदार जल्लोष करून या निर्णयाचे स्वागत केले. तर, गावोगावी देखील अशाच प्रकारचे आनंदात स्वागत करण्यात येत आहे.

दरम्यान, आज दुपारी राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आता आंदोलक आपापल्या गावांच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. आज रात्रीपर्यंतच मुंबई खाली करण्याचे नियोजन यातून दिसून येत आहे. तर जाणाऱ्या मराठा समाजबांधवांनी शांततेत गावाची वाट धरल्याचे दिसून येत आहे.



