Home प्रशासन मराठा आंदोलनास एक दिवसाची मुदतवाढ; मनोज जरांगे मुंबईत ठाम

मराठा आंदोलनास एक दिवसाची मुदतवाढ; मनोज जरांगे मुंबईत ठाम


मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा ।  मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास आज संपलेली परवानगी लक्षात घेता, मुंबई पोलिसांनी पुन्हा एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. वाहतूक कोंडीसारख्या घटना व नियमनातील त्रुटी लक्षात घेता काही अटींसह ही परवानगी मंजूर करण्यात आली आहे. यामुळे आंदोलन उद्याही सुरू राहणार असून पुन्हा मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

आज दिवसभर आंदोलकांच्या मोठ्या संख्येमुळे मुंबईतील वाहतूक विस्कळीत झाली. विशेषतः आझाद मैदान परिसरात रस्ते बंद होण्याच्या घटना समोर आल्या. यापार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरुवातीला आंदोलनास मुदतवाढ देण्याबाबत साशंकता व्यक्त केली होती. मात्र, जरांगे पाटील यांनी विनंती अर्ज करत परवानगी मागितल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर एक दिवसाची मुदतवाढ दिली गेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी पोलिसांनी नव्या अटी व नियम लागू केले असून त्यांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी आयोजकांवर टाकण्यात आली आहे.

दुसरीकडे, आंदोलनावेळी वाहने रस्त्यात आडवी लावल्याने वाहतूक अडथळा निर्माण झाला. आंदोलकांनी आधी वाहतुकीबाबत संयमाचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात गोंधळ वाढल्याने पोलीस नाराज झाले. त्याचाच परिणाम म्हणून आंदोलनास मुदतवाढीची परवानगी देताना यावेळी नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी भाषणातून आपली भूमिका स्पष्ट करत आंदोलन सुरूच राहील असे जाहीर केले. त्यानंतर काही आंदोलक वाशीच्या दिशेने रवाना झाले असून, तिथे त्यांच्यासाठी मुक्कामाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे. परिणामी, मुंबईतील ईस्टर्न फ्री वेवरील वाहतूक सुरळीत झाली असून, वाहतूककोंडीचा त्रास सध्या नाही.

या आंदोलनावरून वाद निर्माण झाला असून अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयाच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच, या आंदोलनास समर्थन दिल्याबद्दल शिवसेना (उबाठा गट) प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय जाधव व बजरंग सोनवणे यांच्यावरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सदावर्ते यांनी ही तक्रार आझाद मैदान पोलिसांकडे दिली असून पुढील कारवाईबाबत पोलीस विभाग विचारमंथन करत आहे.


Protected Content

Play sound