नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीचा निर्णय घेऊन १ हजार आणि ५०० च्या चलनी नोटा बंद केल्या. परंतू नोटबंदीच्या या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. तर अनेकांना त्यांचा जीव गमावावा लागला,असे ट्विट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. नोटबंदीच्या निर्णयाला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी हे ट्विट केलेय.
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता. नोटबंदीच्या निर्णयामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. अनेक लहानसहान उद्योग ठप्प झाले आहेत. या निर्णयामुळे लाखो नागरिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. असेही राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या क्रूर हल्ल्यामागे ज्या कोणी व्यक्ती असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी अशीही मागणी राहुल गांधी यांनी केली.