भुसावळ–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील वादग्रस्त वांजोळा रोड चौफुलीवर आज पहाटे सुमारे पाच वाजेच्या सुमारास मोठा अपघात टळल्याची घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालकाने स्वतःचा कंटेनर थेट रस्त्याच्या डिव्हायडरमध्ये घालून गंभीर दुर्घटना टाळली. या धाडसी निर्णयामुळे बोलोरो वाहनातील काही प्रवाशांचे प्राण वाचले असून कंटेनर चालकाच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरून वेगात येणाऱ्या कंटेनरसमोर अचानक एक बोलोरो वाहन आले. धडक होण्याची तीव्र शक्यता लक्षात येताच कंटेनर चालकाने क्षणाचाही विलंब न करता वाहन वळवत ते थेट डिव्हायडरमध्ये अडकवले. या धक्क्यात कंटेनरचे मोठे नुकसान झाले असले तरी समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनातील प्रवाशांचे प्राण वाचले, त्यामुळे संभाव्य भीषण दुर्घटना टळली.

वांजोळा रोड चौफुली ही अत्यंत धोकादायक म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले असून आतापर्यंत नऊ जणांचा जीव गेला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात आली आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या दुर्घटनांनंतरही महामार्ग प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आजचा अपघातही मोठ्या जीवितहानीत परिवर्तित झाला असता, मात्र कंटेनर चालकाने स्वतःचा जीव व वाहन धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवले. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी पोलिस व महामार्ग कर्मचाऱ्यांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार संतोष चौधरी, नगराध्यक्ष गायत्री भंगाळे तसेच इतर नगरसेवकांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी वांजोळा रोड चौफुली कायमस्वरूपी बंद करून सुरक्षित पर्यायी मार्गाचा वापर नागरिकांनी करावा, अशी मागणी केली. नागरिकांचे प्राण धोक्यात येऊ नयेत यासाठी तातडीने ठोस निर्णय घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.



