नाशिक (वृत्तसंस्था) भाजपच्या नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडेंसह भाजपचे अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा, शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. पंकजा मुंडेंनी सोशल मीडियातून भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचे संकेत नुकतेच दिले आहेत.
पंकजा मुंडे लवकरच भाजप सोडणार असल्याची चर्चा सुरू असताना संजय राऊतांनी हे विधान केल्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा त्यांचे बंधू धनंजय मुंडेंकडून धक्कादायक पराभव झाला होता. त्यानंतर राज्यातील सत्ता भाजपने गमावली. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आता स्थापन झाले आहे. या सर्व घडामोडीनंतर पंकजा मुंडे यांनी रविवारी आपल्या समर्थकांसाठी फेसबूकवर पोस्ट लिहिली आहे. आपला निर्णय, भविष्यातील भूमिका त्या 12 डिसेंबरला जाहीर करणार आहेत. तशातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंकजा मुंडेंसह भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे.