जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात गुरूपौर्णिमेच्या पावन निमित्ताने मंत्र साधना कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. योगपंडित इंजिनिअर एकनाथ बावने यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी मंत्रसाधनेचा अनुभव घेतला.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि योगशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमात गुरूपौर्णिमेच्या दिवशी मंत्र साधनेचे अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व विद्यार्थ्यांना उलगडून सांगण्यात आले. योगशास्त्र विभागप्रमुख इंजि. राजेश पाटील यांच्या प्रास्ताविकानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक योगतज्ज्ञ एकनाथ बावने यांनी विद्यार्थ्यांना मंत्रसाधनेत सहभागी करून घेतले. त्यांनी स्पष्ट केले की, मंत्रसाधना केवळ अध्यात्मिक प्रक्रिया नसून ती नकारात्मकता दूर करत जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. हठ योग, राज योग, कुंडलिनी योग आणि क्रिया योग यांसारख्या योग मार्गांद्वारे जीवनाच्या उच्च ध्येयाकडे वाटचाल करता येते, असे ते म्हणाले.

रा.से.यो. संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी विद्यार्थ्यांना गुरूंचे जीवनातील महत्व समजावून सांगितले. गुरू हा प्रत्येक वळणावर मार्गदर्शक असतो आणि मंत्रसाधना ही गुरूकृपेचा अनुभव घेण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक करताना इंजि. पाटील यांनी सांगितले की, मंत्रसाधना म्हणजे फक्त शब्दांची पुनरावृत्ती नसून त्या शब्दांच्या उच्चारणातून निर्माण होणाऱ्या कंपनांनी शरीर व मनावर सकारात्मक परिणाम होतो.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. लिना चौधरी यांनी अतिशय नेटकेपणाने पार पाडले. आभार प्रा. गितांजली भंगाळे यांनी मानले. कार्यक्रमास प्रा. लिंता चौधरी, वाल्मिक पाटील, यशवंत गरूड, सुरेश बागुल, हिंमत जाधव यांच्यासह विद्यापीठातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण वातावरण मंत्रोच्चारांनी भारले गेले होते आणि विद्यार्थ्यांनीही एकाग्रतेने साधनेचा अनुभव घेतला.



