
जालना-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईत होणाऱ्या निर्णायक आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा मोर्चा मुंबईकडे रवाना होण्याच्या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांनी त्यांच्या ताफ्याला अटीशर्तींसह हिरवा कंदील दिला आहे. जिल्हा हद्दीतून शांततेत आणि नियमानुसार प्रवास करण्याच्या अटींसह पोलिसांनी ४० अटींसह परवानगी दिली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, ड्रोन आणि बॉम्ब शोधक पथकासह पोलिस यंत्रणा सज्ज आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 168 अंतर्गत नोटीस बजावून ही परवानगी देण्यात आली आहे. अटींमध्ये प्रवास मार्ग निश्चित ठेवणे, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घोषणा किंवा वक्तव्ये न करणे, वाहनांची सुरक्षितता, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण, स्वच्छता, आरोग्य आणि सार्वजनिक वाहतूक सेवा बाधित न होण्यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना समाविष्ट आहेत. जालन्याच्या हद्दीत कोणत्या गावातून किती लोक सहभागी होणार, याची माहिती आधीपासून पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अटींचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यासोबत हजारो मराठा बांधव उपस्थित असून, काहीजण ट्रक, टेम्पो व इतर वाहनांमधून आपल्या साहित्यांसह आंतरवाली येथे दाखल झाले आहेत. मंगळवारी मध्यरात्रीपासून मराठवाड्यातील विविध भागांतून आंदोलकांनी आंतरवाली गाठले असून, आज सकाळी १० वाजता अधिकृतपणे मुंबईकडे मोर्चा निघणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शांततेचे आवाहन केले असून कोणत्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बंदोबस्तासाठी ४५० पोलिस कर्मचारी, दोन एसआरपीएफ कंपन्या, बॉम्ब शोधक व निष्क्रीयकरण पथक आणि ड्रोन कॅमेऱ्यांची तैनाती करण्यात आली आहे. मोर्चाच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांची नजर असून, कोणतीही संशयास्पद कृती निदर्शनास आली तर तातडीने कारवाई केली जाणार आहे. मोर्चातील प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येणार असून, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई अनिवार्य असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा विषय पेटणार असून मुंबईतील आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शांततापूर्ण आणि नियमबद्ध पद्धतीने आंदोलन करण्यासाठी पोलिस आणि आंदोलक दोघांकडूनही प्रयत्न सुरू आहेत.



