सरकारच्या शिष्टमंडळाला सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगेनी १३ जुलैपर्यंत दिला वेळ

आंतरवाली सराटी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला वेळ द्या, अशी मागणी करत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा समाजाला सरकार आरक्षण देणारच आहे. मात्र, आधी तुमच्या तब्बेतीची काळजी घ्या आणि उपोषण मागे घ्या, अशी विनंती मंत्री शंभुराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली. सरकारच्या वतीने किमान महिनाभराचा कालावधीची मागणी या वेळी करण्यात आली. तर 30 जूनपर्यंत निर्णय घेण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र, सरकारच्या विनंतीनुसार आता सरकारला 13 जुलैपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे पुन्हा एका उपोषणाला सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा समाजाला सगेसोयऱ्यांचे आरक्षण देण्यासाठी आम्हाला एक महिन्यांचा कालावधी द्यावा, अशी विनंती मंत्री शंभुराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळात मंत्री शंभुराज देसाई, नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे आणि राणा जगजितसिंह यांचा समावेश आहे.

एक महिन्याचा अवधी सरकारच्या वतीने मागण्यात आला आहे. त्यानुसार मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला एक महिन्याचा अवधी दिला आहे. मात्र, एका महिन्याच्या आत काम न केल्यास विधानसभा निवडणुकीला उतरणार असल्याचा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यानुसार आता 13 जुलैपर्यंत राज्य सरकारने सर्व निर्णय घेण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

Protected Content