मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात सध्या मराठा- ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारने मागण्या मान्य न केल्यास निवडणुकीत उतरणार असल्याचा इशारा यापूर्वी दिला होता. तसेच नुकतेच छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅली पार पडली. यावेळी त्यांनी येत्या २० जुलैपासून पुन्हा उपोषण करणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र यावरून आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना सल्ला दिला आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण करण्यापेक्षा २८८ जागा लढवल्या पाहिजेत असे आंबेडकर म्हणाले आहेत.
प्रसार माध्यमांशी बोलतांना प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, ”मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. या मागणीसंदर्भात राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. अशा आशयाचे पत्र द्यायचे असे सर्वपक्षीय बैठकीत ठरले होते. मात्र, अद्याप तरी वंचित बहुजन आघाडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्र आलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत खुलासा करावा आणि ते कधीपर्यंत पत्र पाठवणार आहेत हे सांगावे”, असे आंबेडकर म्हणाले.
पुढे आंबेडकर म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांना माझे सांगणे आहे की, त्यांनी निवडणूक लढवण्याबाबत भूमिका जाहीर केली होती. आता त्यांनी 288 जागांवर विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. ते लढतील अशी माझी अपेक्षा आहे असे आंबेडकर म्हणाले. तसेच राज्यात सध्या तिसरी आघाडी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत आंबेडकर म्हणाले, तिसऱ्या आघाडीच्या चर्चांमध्ये काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. राजकारणात अनेक डावपेच असतात. त्यामुळे त्यापैकी हा एक डावपेच आहे, असे मी मानतो. असा काही प्रस्ताव आल्यावर भविष्यात पाहू असे आंबेडकर म्हणाले.