जालना – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. आता या वादात नवे वळण आले आहे. धनंजय मुंडेंनी दिलेले आव्हान स्वीकारत मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः नार्को टेस्टसाठी तयारी दर्शवली असून जालना पोलीस अधीक्षकांकडे यासंदर्भात अधिकृत अर्ज सादर केला आहे. “या प्रकरणातील सर्वांचीच नार्को टेस्ट आजच करा,” अशी मागणी जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळाने केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्यासह अंतरवली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं की, “मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येकाचीच तपासणी झाली पाहिजे, तेव्हाच सत्य बाहेर येईल.”

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची अडीच कोटींची सुपारी दिली, असा खळबळजनक आरोप केला होता. या आरोपानंतर राज्यभरात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेत दोन ऑडिओ क्लिप्स सादर केल्या, ज्यामध्ये त्यांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींसह धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित संभाषण असल्याचा दावा केला. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी सीबीआय चौकशीची मागणी करत “मी स्वतः पहिला अर्ज नार्को टेस्टसाठी देणार,” असंही जाहीर केलं होतं.
त्यावर प्रत्युत्तर देताना धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली असून “आरोपींसह माझी आणि जरांगे यांची नार्को टेस्ट करा,” असं खुले आव्हान दिलं. या घडामोडींनंतर जरांगे पाटलांनीही आव्हान स्वीकारत अधिकृतपणे आपली तयारी दाखवली आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी गोंदी पोलिसांनी अमोल खुणे आणि विवेक उर्फ दादा गरुड या दोघांना अटक केली आहे. कोर्टाने या दोघांनाही 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी अमोल खुणे हा जरांगे पाटलांचा समर्थक असल्याचे सांगितले जात असले, तरी खुणे कुटुंबीयांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. “दारूच्या नशेत माझ्या पतीकडून हे जबरदस्तीने बोलून घेतले,” असा दावा अमोल खुणेच्या पत्नीने केला आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप आमदार सुरेश धस यांनी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेतली. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मुंडे आणि धस यांच्या भेटीवर जरांगे यांनी टीका केली होती. त्यानंतर लगेचच धस यांनी जरांगे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेचे वारे जोरात वाहू लागले आहेत.
या सर्व प्रकरणामुळे मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. नार्को टेस्टची मागणी आणि सुपारी प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने वळतो, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



