
मुंबई (वृत्तसंस्था) आर्थिक मंदीबाबत कितीही उलटसुलट सांगितले, तरी सत्याचा कोंबडा आरवला आहे आणि मौनीबाबा डॉ. मनमोहन सिंग यांनी सौम्य शब्दात सांगितलेल्या सत्याचा स्फोट झाला आहे. त्यांचा सल्ला गांभीर्याने घेण्यातच देशाचे हित आहे, असा सूचक सल्ला उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजप सरकारला दिला आहे. भारताचा आर्थिक विकास दर घसरल्याने प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.
देशातील आर्थिक स्थिती आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी केलेले भाष्य यावर शिवसेनेने सामना मुखपत्राच्या अग्रलेखातून मोदी सरकारच्या डोळ्यात अंजन घातले आहे. गणेशाच्या आगमनाने विघ्ने दूर होतील अशी आशा होती, पण देशाच्या अर्थव्यवस्थेचे विघ्न काही दूर होताना दिसत नाही. उलट चिंतेत भर टाकणाऱ्या बातम्या येत आहेत. त्यात मनमोहन सिंग यांनी मंदीसंदर्भात भाष्य केले व भविष्यातील कठीण काळाची जाणीव करून दिली. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. अर्थव्यवस्था घसरली आहे व भविष्यात कोसळणार आहे असे जेव्हा मनमोहन सिंग सांगतात तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांच्या कर्तबगारीवर आमचा विश्वास आहे. त्यांनी देशाला शिस्त लावली आहे.
मोदी यांनी पाकिस्तानला धडा शिकविण्याचे ठरवले आहे. मोदी ते करून दाखवतील याबाबत आमच्या मनात शंका नाही, पण अर्थव्यवस्था व लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. अर्थव्यवस्थेतील खाचखळग्यांबाबत मनमोहन सिंग बोलत आहेत.देशाचा विकास दर घसरला आहे, उत्पादन क्षेत्रातील वाढ घसरली आहे व लाखो लोकांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे. मात्र हे चित्र सरकारला भयावह वाटू नये ही स्थिती धक्कादायक आहे. असा सूचक इशारा शिवसेनेने दिला आहे. देशात आर्थिक मंदीमुळे जी भयंकर स्थिती उद्भवली आहे, त्याचे भाकित मनमोहन सिंग यांनी चार वर्षांपूर्वीच केले होते. आज जे घडत आहे, ते घडणार असे ‘मि. क्लीन’ मनमोहन यांचे तळमळीचे सांगणे होते’, असे सामनामध्ये म्हटले आहे.