नंदुरबार (प्रतिनिधी) जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री माणिकराव गावित यांचे स्वीय सहाय्यक भगवान रामचंद्र गिरासे यांनी शुक्रवार ५ एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी दोरी कापली व गिरासे यांना नवापूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला ? ते समजू शकलेले नाही.
मागच्या शनिवारी माणिकराव गावित काँग्रेस नेत्यांची भेट घेण्यासाठी दादर टिळक भवन येथील कार्यालयात आले होते. त्यावेळी गिरासे सुद्धा त्यांच्यासोबत होते. पण नंतर तिथून गिरासे बेपत्ता झाले. पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केल्यानंतर एक एप्रिल रोजी गुजरातमध्ये ते सापडले. गिरासे सापडले तेव्हा त्यांचे केस आणि मिशी कापलेली होती. त्यामुळे त्यांचे अपहरण झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पोलिसांना ते सापडले तेव्हा ते काहीही बोलण्याच्या स्थितीमध्ये नव्हते. आपण रेल्वेतून पडलो ऐवढेच त्यांनी पोलिसांना सांगितले. घरी आल्यापासूनही ते कोणाबरोबरही फारसे बोलत नव्हते. त्यात त्यांनी आज आत्महत्येचा प्रयत्न केला.