Home राजकीय नाशिक न्यायालयात माणिकराव कोकाटेंचा युक्तिवाद ; पुढील सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी

नाशिक न्यायालयात माणिकराव कोकाटेंचा युक्तिवाद ; पुढील सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी


नाशिक – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आमदार रोहित पवार यांच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यावर आज (६ ऑक्टोबर) नाशिक सिव्हिल कोर्टात सुनावणी झाली. ‘जंगली रम्मी’ खेळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने निर्माण झालेल्या वादानंतर, कोकाटे यांनी स्वतः न्यायालयात हजर राहून आपली बाजू प्रभावीपणे मांडली. या खटल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेचे वारे वाहू लागले आहेत.

कोकाटेंनी कोर्टात दिलेल्या जबाबात सांगितले की, विधान परिषद सत्रादरम्यान त्यांच्या मोबाईलवर ‘जंगली रम्मी’ नावाची जाहिरात आली होती. ती जाहिरात बंद करत असताना सुमारे १५ ते २० मिनिटांचा वेळ लागला. त्याच दरम्यानचा व्हिडीओ कोणीतरी काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हिडीओच्या आधारे आमदार रोहित पवार यांनी थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत बदनामी केली, असा आरोप कोकाटे यांनी केला.

या व्हिडीओमुळे त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय प्रतिमेला मोठा धक्का बसल्याचे त्यांनी नमूद केले. “या संपूर्ण प्रकारामुळे मला कृषीमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. माझ्या पक्षात आणि जनतेत माझ्या बद्दल गैरसमज निर्माण झाला,” असे कोकाटे यांनी कोर्टात स्पष्ट केले. विशेष म्हणजे, रोहित पवार हे विधान परिषदेचे सदस्य नसतानाही त्यांच्याकडे व्हिडीओ कसा पोहोचला? याचा तपास होणे आवश्यक असल्याचे कोकाटेंचे म्हणणे आहे.

या प्रकरणात कोकाटेंचे वकील डॉ. मनोज पिंगळे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, “व्हिडीओ खरा आहे की बनावट, त्यामागे कोणते तंत्रज्ञान वापरण्यात आले याची सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास ठेवतो.”

दुसरीकडे, या मुद्द्यावर अजूनही रोहित पवार यांनी कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र, या खटल्यामुळे दोघांमध्ये वाढलेल्या राजकीय धुसफुसीचा अंदाज स्पष्टपणे घेतला जात आहे. एकीकडे शरद पवार गटाचे रोहित पवार आक्रमक पवित्रा घेत आहेत, तर दुसरीकडे कोकाटे यांनी न्यायालयात आपली बाजू मांडत राजकीय शर्यतीत आपला प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

या खटल्याची पुढील सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या दिवशी न्यायालय काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विशेषतः सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात या प्रकरणाचा पुढील काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Protected Content

Play sound