जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बसमध्ये चढत असताना एका ६९ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत (मंगळसूत्र) अज्ञात चोरट्याने अत्यंत शिताफीने चोरून नेल्याची घटना रविवारी ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जामनेर बसस्थानकात घडली आहे. याबाबत रात्री ९ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगलाबाई हिरालाल जैन (वय ६९, रा. गोविंद कॉलनी, भुसावळ) या जामनेर येथून भुसावळकडे जाण्यासाठी बस स्थानकावर आल्या होत्या. दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पाचोरा ते भुसावळ या मार्गावरील बस जामनेरच्या बसस्थानकावर आली. या बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.

मंगलाबाई या गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढत असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीची आणि १८ ग्रॅम सोन्याची पोत चोरून नेली. बसमध्ये बसल्यानंतर काही वेळाने मंगलाबाईंच्या लक्षात आले की त्यांच्या गळ्यातील दागिना गायब आहे. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता चोरटा पसार झाल्याचे समजले. याप्रकरणी मंगलाबाई जैन यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.



