जळगाव प्रतिनिधी । शहरातील इंजिनिअरींगचे शिक्षण घेणाऱ्या तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केला. यात गर्भवती होवून मुलगा झाला तरी लग्न न करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षाची सश्रम कारावास आणि ३ लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
जयकुमार अशोक सोनवणे असे आरोपीचे नाव आहे. जयकुमारने पिडीतेशी तिच्या मैत्रीणीकडून जवळीक साधून लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने वेळोवेळी बलात्कार केला मात्र तिच्याशी लग्न केले नाही, सदरील अत्याचारातुन पिडीतेस मुलगा जन्मास आला. तरीही लग्न न केल्याने पिडीतेने शहर पोलिस ठाण्यात ३७६ व इतर सह कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. यातील पिडीता व आरोपी दोघे एकाच समाजाचे असुन पिडीता सन २०११-१२ मध्ये जळगाव येथे शासकीय अभियांत्रिकी वसतिगृहात राहत होती. त्यानंतर सन २०१३-१४ पावेतो पिडीता तिचे मैत्रीणी सोबत एकाच खोलीत रहात होती. त्या वेळी आरोपीने तिच्या मैत्रीणीमार्फेत पिडीतेशी जवळीक साधून तिला प्रेमात गुंतवून आरोपीने त्याच्या घरी व शहरातील साईराम लॉज येथे तसेच वेळोवेळी कारमध्ये निर्जन स्थळी नेवून जुलै २०१४ पासून फेब्रुवारी २०१५ पर्यंत लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवले.
हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात चालला. खटल्यात १० साक्षिदार तपासण्यात आले. यात पिडीतेचा जबाब व वैदयकिय पुरावा विशेषत डीएनए रिपोर्ट महत्वाचा ठरला. सदरील बलात्कार प्रकरणी आरोपीस दोषी ठरवून भा.द.वि. कलाम ३७६ खाली १० वर्ष सश्रम कारावास व ३ लाख रूपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साधी कैद व कलम ४१७ खाली फसवणुकी बाबत सहा महिने सश्रम कारावास व तीन हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली.
दंडाची ३ लाख रूपयांची रक्कम पिडीतेस व त्यांच्या मुलास नुकसान भरपाई म्हणून चरितार्थासाठी देण्याबाबतचे आदेश आहेत. सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकिल ॲड. पंढरीनाथ चौधरी यांनी काम पाहिले.