Home क्राईम मोटरसायकलवर सागवान लाकूड वाहतूक करणारा अटकेत ; दोघे फरार

मोटरसायकलवर सागवान लाकूड वाहतूक करणारा अटकेत ; दोघे फरार


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सातपुडा पर्वतरांगांच्या परिसरात बेकायदेशीर सागवान तस्करीविरोधात यावल पश्चिम वनविभागाने मोठी कारवाई करत मोटरसायकलवरून सागवान चौपट वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली असून दोन जण फरार झाले आहेत. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे वनतस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

वनविभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातपुडा पर्वताच्या क्षेत्रातील नियतक्षेत्र वाघझिरा येथे गुप्त माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या गस्ती पथकाने सापळा रचला होता. यावल तालुक्यातील वाघझिरा वनजमिनीच्या कक्ष क्रमांक १४७ मध्ये गस्त घालत असताना साग प्रजातीच्या झाडांची तोड करून त्याचे चौपट तयार करण्यात आले असल्याचे आढळले. संबंधित आरोपी मोटरसायकलवरून हे सागवान चौपट वाहतूक करत असताना गस्ती पथकाच्या निदर्शनास आले.

वनकर्मचाऱ्यांनी पाठलाग केल्यानंतर आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी परप्रांतीय आरोपी सुशील केशराम पावरा (रा. चिखली, ता. वरला, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात यश आले, तर इतर दोघांनी सागवान चौपट फेकून जंगलात पळ काढला. जप्त करण्यात आलेल्या सागवान चौपटाची किंमत १,९१४ रुपये असल्याचे सांगण्यात आले. तसेच एकूण २२,६५८ रुपयांचे वननुकसान झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी वनपाल वाघझिरा यांनी गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी संजय गेंदा पावरा (रा. वाघझिरा, ता. यावल) आणि परशुराम तेरसिंग पावरा (रा. वाघझिरा, ता. यावल) हे सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीस न्यायालयात हजर केले असता  १८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक, यावल वनविभाग, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक जमीर शेख व यावल पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत जोशी यांच्या नेतृत्वात पार पडली. वनपाल विपुल पाटील, वनरक्षक हनुमंत सोनवणे, जगदीश बारेला, चेतन शेलार, अशोक राठोड व इतर वनसेवकांनी या कारवाईत सहभाग घेतला.


Protected Content

Play sound