पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. भडगाव रोडवरील अंतुर्ली फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली असून, आरोपीकडून एक धारदार तलवार आणि एक मोटारसायकल असा एकूण ११,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील भडगाव रोडवरील अंतुर्ली फाटा परिसरात बुधवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एक तरुण संशयास्पदरीत्या वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस कॉन्स्टेबल संदीप बजरंग राजपूत व त्यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली.

पोलिसांनी केलेल्या झडतीत संशयित आरोपी ललीत गोपाळ चौधरी (वय २८, रा. न्हावी गल्ली, पारोळा) याच्या ताब्यातून एक लोखंडी धारदार तलवार मिळून आली. तलवारसह दुचाकी पोलीसांनी जप्त केला आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी ललीत चौधरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील हे करीत आहे.



