जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या तरूणाने शेजारी राहणाऱ्या दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील एका भागात विवाहिता आपल्या पती व सासू सासऱ्यांसोबत राहते. विवाहिता ही मेसमध्ये काम करून कुटुंबाला हातभार लावते. १५ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास कुटुंबातील सर्वजण जेवण करत असतांना तर तिचा पती हा घराशेजारी असलेल्या पानटपरीवर तंबाखू खाण्यासाठी गेला होता. याचवेळी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास त्याच परिसरात राहणारा अक्षय बाब्या धोबी हा त्या विवाहितेच्या पतीला चाकूचा धाक दाखवित दमदाटी करीत होता. हा प्रकार विवाहितेच्या पतीने घरात सांगितला असता त्याच्या पत्नीने चाकूचा धाक दाखविणार्यास जाब विचारला असता त्याने त्या विवाहितेचे दोन्ही हात पकडून तिच्या नवरल्याला जीवेठार मारण्याची धमकी दिली.
जाब विचारल्याचा राग आल्याने अक्षय धोबी याने त्या विवाहीतेला जमिनीवर ढकलून विवाहितेला मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावेळी त्या विवाहितेने त्याचा प्रतिकार केला असता त्या विवाहितेला त्याने लाथाबुक्क्यानी मारहाण करीत जखमी केले. यावेळी परिसरातील नागरिकांनी अक्षय धोबीच्या तावडीतून विवाहितेची सुटका केली.
अक्षय धोबीकडून हा तरुण विवाहितेला मारहाण करीत असतांना त्याच्या हातातील चाकूमुळे त्या विवाहितेच्या सासूला खरचटले गेल्याने त्या जखमी झाल्या. दरम्यान परिसरातील नागरिकांची गर्दी होत असल्याचे बघून अक्षय धोबी हा त्याठिकाणाहून चाकू घेवून पळून गेला. दरम्यान ही महिला तक्रार देण्यासाठी रामानंदनगर पोलिस ठाण्यात आली. परंतु तया महिला जखमी झाल्याने तीला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर आज ती विवाहितेच्या तक्रारीवरुन रामानंद नगर पोलिसात अक्षय बाब्या धोबी याच्याविरुद्ध विनयभंग व आर्म ऍक्टचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.