Home क्राईम अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्याला सोलापूरातून अटक !

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्याला सोलापूरातून अटक !


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर पोलीस स्टेशन हद्दीतून के-हाळा येथून पळवून नेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा रावेर पोलिसांनी यशस्वीपणे शोध लावला आहे. मुलीला पळवून नेणाऱ्या मुलासह तिला सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले असून, मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रावेर पोलीस स्टेशन येथे रुमा पुन्या भिलाला (रा. चोपाली, ता. झिरण्या, जि. खरगोन, मध्य प्रदेश, ह.मु. के-हाळा, ता. रावेर) यांनी फिर्याद दिली होती की, अज्ञात इसमाने त्यांच्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (जळगाव), उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप (चोपडा) आणि अतिरिक्त कार्यभार फैजपूर विभाग पो.नि. डॉ. विशाल जयस्वाल यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले होते.

गुप्त बातमीदार, नातेवाईकांची चौकशी आणि तांत्रिक विश्लेषण या आधारे पोलिसांनी गुन्ह्यातील मुलीची माहिती काढली. आरोपी राज्या सोन्या बारेला (रा. केऱ्हाळा बु., ता. रावेर) याचा सोलापूर जिल्ह्यातील असलुज माळशिजर येथून मोठ्या शिताफीने माग काढत त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत पीडित मुलीलाही ताब्यात घेऊन सुखरूप रावेर येथे आणण्यात आले. त्यानंतर मुलीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन हे करत आहेत. पो.हे.कॉ. विष्णू भिल, पो.कॉ. सचिन घुगे, पो.कॉ. नितीन सपकाळे, म.पो.कॉ. उज्वला पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. रावेर पोलिसांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे सन २०२४ ते २०२५ या कालावधीत दाखल झालेल्या १२ गुन्ह्यांमधील १३ अल्पवयीन मुली व मुलांचा शोध घेण्यात यश आले आहे.


Protected Content

Play sound