Home क्राईम घरगुती गॅसची अवैध विक्री करणाऱ्याला अटक; ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

घरगुती गॅसची अवैध विक्री करणाऱ्याला अटक; ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त


पाचोरा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पाचोरा शहरातील जारगाव चौफुली जवळील एका दुकानाच्या पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅस (LPG) इंधन म्हणून वाहनांमध्ये भरला जात असल्याची गोपनीय माहिती पाचोरा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी, १८ जुलै रोजी छापा टाकून शेख शहेबाज शफुद्दीन (रा. नुरानीनगर) याला रंगेहाथ अटक केली आहे.

पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार (Rahul Kumar Pawar) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या ठिकाणी धाड टाकली असता, घटनास्थळी घरगुती वापराचे २१ गॅस सिलिंडर (LPG Cylinders), वाहनात गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रिक मोटर (Electric Motor) आणि इतर साहित्य असा एकूण ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक पाटील, रणजीत पाटील, पोकॉ संदीप राजपूत, संदीप भोई आणि गणेश राऊळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या परिसरात गेल्या चार महिन्यांत अशा प्रकारची चौथी कारवाई असूनही, अवैध गॅस विक्रीचा व्यवसाय थांबलेला नाही. त्यामुळे वारंवार कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


Protected Content

Play sound