कोलकाता (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमधील हाणामारीच्या घटनांमुळे निवडणूक आयोगाने प्रचारावर एक दिवस आधीच बंदी आणली आहे. त्यामुळे आज पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, आज पश्चिम बंगालमध्ये ममता-मोदी आमने सामने येणार आहेत. त्यामुळे सुरक्षतेचे उपाय म्हणून राज्यभरात केंद्रीय राखीव दल तैनात करण्यात आले आहे.
आज प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मथुरापूर आणि डायमंड हार्बर येथे निवडणूक रॅली होणार आहे. त्यानंतर कोलकाता ते जाका आणि सुकांता सेतु या मार्गावर ममता बॅनर्जी पदयात्रा काढणार आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीही पश्चिम बंगालमध्ये मथुरापूर तसेच डमडम येथेही प्रचारसभा घेणार आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमधील राजकारण आज ढवळून निघणार आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे आज अतिरिक्त केंद्रीय राखीव दल तैनात करण्यात आले आहे. बंगालमधील डमडम, बारासात, बशिरहाट, जयनगर, मथुरापूर, डायमंड हार्बर, जादवपूर, कोलकाता दक्षिण व कोलकाता उत्तर या नऊ ठिकाणी येत्या रविवारी मतदान आहे.