मलिक यांनी पुन्हा सादर केला वानखेडेंचा जन्म दाखला

मुंबई प्रतिनिधी | एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या जन्माचा दाखल सादर करून ते मुस्लीम असल्याचा दावा नवाब मलीक यांनी पुन्हा केला असून याच्या समर्थनार्थ जन्म दाखल सादर केला आहे.

 

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंवर आणखी काही आरोप केले आहेत. याप्रसंगी ते म्हणाले की, समीर दाऊद वानखेडे यांचा खोटेपणा समोर येत आहे. शेजारी असणार्‍या एका आयपीएस अधिकार्‍यासोबत त्यांचा वाद झाल्यानंतर त्यांच्या मुलाला खोट्या आरोपांमध्ये फसवण्याचे काम केले. त्या अधिकार्‍यांनी एनडीपीएस कोर्टामध्ये सीसीटीव्ही तपासण्याची मागणी केली होती. समीर वानखेडेंनी त्यांच्या मुलाला बोलावून घेतले. त्याला बोगस ड्रग्ज प्रकरणात अडकवले. ज्या मुलीला समीन वानखेडेंनी घटस्फोट दिला होता ती त्यांच्या विरोधात उभी राहण्याची त्यांना भीती होती. त्यामुळे त्या मुलीच्या भावाकडे एका तस्कराकडून ड्रग्ज ठेवण्यात आले आणि त्याला अटक करण्यात आली. समीर वानखेडेंनी माझ्याविरोधात तुम्ही उभे राहिलात तर संपूर्ण कुटुंबाला ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती. मुलीच्या घरच्यांना घाबरवण्यात आले. पण हळूहळू सर्व बाहेर येत आहे, असे आरोप नवाब मलिक यांनी केला.

 

दरम्यान, नवाब मलिक यांनी गुरुवारी नवे कागदपत्रे सादर केली आहेत. सेंट जोसेफ हायस्कूल आणि सेंट पॉल हायस्कूलचे शाळा सोडल्याचे दाखले नवाब मलिकांनी समोर आणले. ही दोन्ही प्रमाणपत्रे समीर वानखेडे यांची आहेत. ज्यात त्यांचे पूर्ण नाव समीर दाऊद वानखेडे असे लिहिले आहे. समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण देणारे प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले होते. ज्यामध्ये त्यांचे नाव समीर ज्ञानदेव वानखेडे असे लिहिले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून नवाब मलिक यांनी आता ही नवीन प्रमाणपत्रे दिली आहेत.

 

समीर वानखेडे बनावट कागदपत्रे समोर आणत आहेत. पण त्यांनी जन्मदाखला समोर आणायला हवा होता. हे बनावट आहे आणि आम्ही हे सर्व न्यायालयासमोर ठेवले आहे. समीर वानखेडे बनावट कागदपत्रे दाखवत आहेत. जातपडताळणी अधिकार्‍यांकडेही त्यांची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे समीर वानखेडेंची नोकरी निश्चित जाणार आहे, असे नवाब मलिक म्हणाले.

 

वानखेडेंनी कागदपत्रांमध्ये खाडाखोड करुन १९९३ साली बनावट कागदपत्रे बनवली. तिथले रजिस्टरही गहाळ केले. पण ही कागदपत्रे स्कॅन करुन महापालिकेकडे आहेत हे यांना कळले नाही. ही कागदपत्रे मी न्यायालयाला दिले आहेत, असे मलिक म्हणाले.

Protected Content