माळी,मुस्लीम, मराठा समाजातील माघार घेतलेल्या उमेदवारांचा शिवसेनेला पाठींबा

nilesh chaudhary

धरणगाव (प्रतिनिधी) पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणुकीच्या पोटनिवडणुकीतून माळी, मुस्लीम आणि मराठा समाजातील दिग्गज नेत्यांनी माघार घेत शिवसेनेचे उमेदवार निलेश सुरेश चौधरी यांना पाठींबा दिला आहे. त्यामुळे सध्या तरी शिवसेनेसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, सोमवार १८ डिसेंबर पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पोट निवडणुकीची माघारीची शेवटची तारीख होती. त्यानुसार १३ उमेदवारांनी माघार घेतली. परंतू यातील काही माघार या लक्षवेधी ठरल्या. शहरातील राजकारणात माळी,मुस्लीम, मराठा समाजाची भूमिका महत्वपूर्ण मानली जाते. याच समाजातील युवा कार्यकर्त्यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणुकीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेत शिवसेनेचे उमेदवार निलेश सुरेश चौधरी यांना पाठींबा दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत.

 

महेंद्र महाजन यांचा शिवसेनेला पाठींबा

 

येथील माळी समाजाचे युवानेते महेंद्र उर्फ भैय्याभाऊ गुलाब महाजन यांनी निवडणुकीतून सोमवारी माघार घेत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार निलेश सुरेश चौधरी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. भैय्याभाऊ महाजन यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण शिवसेनेसाठी माघार घेतली असल्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, भैय्याभाऊ महाजन यांच्या माघारीत जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व युवसेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश वाघ यांनी महत्वाची भूमिका बजावली.

 

कॉंग्रेसचे दीपक जाधव  यांची वरिष्ठांच्या आदेशाने माघार

 

येथील नगराध्यक्ष पदासाठीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार तथा मराठा समाजातील युवानेते दीपक जाधव यांनी वरिष्ठांनी आदेश दिल्यामुळे माघार घेतली. तसेच त्यांच्यासह शहरातील काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार निलेश सुरेश चौधरी यांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. शिवसेना नेते तथा आमदार गुलाबराव पाटील, मंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, प्रदेश सचिव डी.जी. पाटील, जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडीतील एक मोठा मित्र पक्ष शिवसेनेसोबत आल्यामुळे शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे.

 

शिवसेनेतील चौघांची पक्ष रणनीतीनुसार माघार

 

शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी पक्षाची एक विशेष रणनीती आखली होती. त्यानुसार त्यांच्यासह चौघांनी काल माघार घेतली. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन यांनी माघार घेतली. तसेच माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका सुरेखा विजय महाजन यांनीही माघार घेतली आहे. एकदंरीत माळी समाजातील तीन दिग्गज नेत्यांनी माघार घेतल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार निलेश चौधरी यांचा मार्ग अधिकच सुकर झाला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेतील पक्षसंघटन किती मजबूत आहे. याचे चित्र यानिमित्ताने समोर आले. अर्थात शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी या संपूर्ण प्रक्रियेत महत्वपूर्ण भूमिका निभावली.

 

तौसीफ पटेल यांचीही माघार

 

स्व.सलीमभाई पटेल यांच्या निधनानंतर पालिकेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव तौसीफ पटेल यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याबद्दल शहरात मोठी सहानभूती होती. परंतू पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी देखील काल आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मुस्लीम समाजात स्व.सलीमभाई पटेल यांच्या परिवाराविषयी मोठा आदर आहे. त्यामुळे तौसीफ पटेल यांची माघार निलेश चौधरी यांच्यासाठी फायद्याची ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

Protected Content