वरणगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच स्थानिक राजकारणात चुरस वाढली असून प्रभाग क्रमांक १० मधील स्पर्धा अधिक रंगतदार बनली आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका सौ. मालाताई मिलिंद मेढे यांनी आज भव्य शक्ती प्रदर्शन करत शिवसेना (शिंदे गट) कडून नगरसेवक पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या शक्ती प्रदर्शनामुळे प्रभागात आणि शहरात निवडणूक वातावरण अधिकच तापले आहे.
मालाताई मेढे या मागील टर्ममध्ये भारतीय जनता पक्षाकडून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांमुळे त्यांनी स्थानिकांमध्ये चांगली छाप निर्माण केली होती. याच कामगिरीच्या बळावर पुन्हा एकदा निवडून येण्याचा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील विविध मूलभूत सुविधा, पायाभूत विकास आणि नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवण्यामुळे त्यांना प्रभागात मजबूत आधार मिळाल्याचे मानले जाते.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून यंदाच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी अद्याप जाहीर झाली नसल्याने त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला. शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करून त्यांनी आज मोठ्या शक्ती प्रदर्शनासह आपला अर्ज दाखल केला. समर्थकांच्या मोठ्या उपस्थितीने संपूर्ण परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले होते.
मालाताई मेढे यांच्या या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक १० मधील निवडणुकीची लढत अधिकच उत्सुकतादायी झाली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पाठींब्यामुळे त्यांची उमेदवारी अधिक मजबूत झाल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. येत्या काही दिवसांत इतर पक्षांकडून होणाऱ्या उमेदवारी घोषणेवरही सर्वांचे लक्ष केंद्रीत आहे.



