यावल प्रतिनिधी । ग्रामसेवकांना चिथावणीखोर अपशब्दाचा वापर करणारे औरंगाबाद येथील आमदार संजय शिरसाट यांचा निषेध करत त्यांच्या गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावल येथील महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने तहसीलदार महेश पवार व प्रभारी गटविकास अधिकारी विलास भाटकर यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, औरंगाबाद येथील आमदार संजय शिरसाट यांनी औरंगाबाद येथे झालेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत भाषण करतांना शासकीय व्यासपीठावरून ग्रामसेवकांना भामटा व हारामखोर असे अपशब्द वापरून ग्रामसेवकांची बदनामी केली. त्याचप्रमाणे चिथावणीखोर शब्दाचा वापर करून ग्रामविकासात सरपंच व ग्रामसेवक यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामसेवक हा तुमचा नोकर आहे. तो तुमच्या हाताखाली काम करतो, त्यांचे ऐकू नका असे बेजबाबदार वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे राज्यातील ग्रामसेवकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आमदार संजय शिरसाट यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी आज ग्रामसेवकांनी एक दिवसीय कामबंद आंदोलन पुकारले आहे. निवेदन देतांना ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष रूबाब तडवी, सचिव पी व्ही तळेले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.