धरणगाव (प्रतिनिधी) शिवाजी जन्मायचे असतील तर आधी घरोघरी जिजाऊ जन्मल्या पाहिजेत आणि देशाला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर विवेकांनंदांच्या स्वप्नातील युवक सत्यात उतरला पाहिजे. महिलांचे मन आणि युवकांचे मनगट बळकट झाले तरच या महापुरुषांचा विचार आपल्यापर्यंत पोहचला असे म्हणता येईल, असे प्रतिपादन लक्ष्मण पाटील सर यांनी केले. ते येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये राजमाता माँसाहेब जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
जी. एस. ए. स्कुल मध्ये १२ जानेवारी ‘युवक दिनाचे’ औचित्य साधून कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम जिजाऊंच्या व विवेकानंदांच्या प्रतिमेला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी पुष्पहार अर्पण केले. त्यांनतर या महापुरुषांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी आज आपल्या परिसरात होत असलेल्या दुःखद घटनांवर सहृदयत संवेदना व्यक्त करतांना शाळेतील शिक्षक लक्ष्मण पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करू शकले कारण त्यांच्या सोबत माँसाहेब जिजाऊंची प्रेरणा होती. शिवरायांच्या गुरू , कुशल प्रशासक , विज्ञानवादी दृष्टिकोन , युद्धनीती शास्रात पारंगत , विविध भाषांच्या जाणकार अशा विविध गुणांनी संपन्न असे जिजाऊंचे व्यक्तिमत्त्व होते. जगाला विश्वबंधुत्व म्हणजे काय हे समजावून सांगणारे विवेकानंद आज समजावून घेणे गरजेचं आहे. धर्माचे निकोप ज्ञान , चारित्र्य संपन्न , विद्वान , प्रगल्भ बुद्धिमत्ता , तेजपुंज व्यक्तिमत्त्व म्हणजेच स्वामी विवेकानंद होय. शिवाजी जन्मायचे असतील तर आधी घरोघरी जिजाऊ जन्मल्या पाहिजेत आणि देशाला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर विवेकांनंदांच्या स्वप्नातील युवक सत्यात उतरला पाहिजे. महिलांचे मन आणि युवकांचे मनगट बळकट झाले तरच या महापुरुषांचा विचार आपल्यापर्यंत पोहचला असे म्हणता येईल, असेही लक्ष्मण पाटील म्हणाले. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकवर्ग , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.