जळगाव प्रतिनिधी । एसटी महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांना तातडीने लस उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पत्राद्वारे मागणी केली आहे.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत व लॉकडाऊन नंतर प्रवाशांची केलेली सेवा सर्वश्रुतच आहे. सद्यस्थितीत देखील महाराष्ट्र राज्यातील प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी अविरत मेहनत घेत असताना दिसत आहेत. प्रवाशांना सेवा देताना अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झालेली असल्याचे समोर आलेले आहे. त्यापैकी अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील झालेला आहे. तरीदेखील या बिकट परिस्थितीत एसटी कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेताना दिसत आहे. ज्याप्रमाणे आपण पोलीस, आरोग्य कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांना लस उपलब्ध करून दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना देखील ही लस उपलब्ध द्यावी अशी मागणी या पत्रात केली आहे. त्याच प्रमाणे मुंबई येथील बेस्ट उपक्रमासाठी जळगाव जिल्ह्यातील चालक-वाहकांना पाठवण्यात येत असते त्यामुळे जळगाव जिल्हा कोरोना या आजाराचे संक्रमण होण्याची शक्यता जास्त असल्याने चालक, वाहक व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण होईल असे कृत्य करू नये असे देखील खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
जळगाव बस आगारातील संयुक्त कृती समितीने आमदार, खासदार व अधिकारी यांच्याशी भेट घेवून बस कर्मचाऱ्यांना लस देण्याबाबत मागणी केली होती. संयुक्त कृती समितीचे राकेश पाटील, प्रताप सोनवणे, सुरेश चांगरे, मनोज सोनवणे, आर.आर. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती सदस्यांनी विभागीय वाहतूक अधिकारी डी. जी. बंजारा यांची भेट घेतली. याप्रसंगी मीडिया प्रमुख श्री गोपाळ पाटील यांची देखील उपस्थिती होती. कर्मचाऱ्यांशी संबंधित विषय लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन श्री बंजारा यांनी दिले.