मुंबई । राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करून एकसंघ काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा ही शरद पवार यांच्याकडे सोपवावी असा सल्ला आज केंद्रीय राज्यमंत्री तथा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून सध्या मोठ्या प्रमाणात वादंग सुरू आहे. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी गांधी घराण्याच्या पलीकडे जाऊन अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. तर निष्ठावंतांनी याला विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमिवर रिपाइं आठवले गटाचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी एक तोडगा सुचविला आहे.
शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करुन त्यांनाच काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद देण्यात यावं अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. काँग्रेसचं अध्यक्षपद स्विकारण्यास राहुल आणि सोनिया गांधी दोघेही तयार नसल्यामुळे ही सूचना करत असल्याचं आठवलेंनी म्हटलंय. आता त्यांचा हा सल्ला एका नवीन चर्चेला आमंत्रण देणारा ठरलाय हे सांगणे नकोच !