मुक्ताईनगर प्रतिनिधी | तलाठी कर्मचार्यांच्या संपामुळे शेतकर्यांना सात-बारा उतारा मिळण्यात अडचणी येत असल्याने प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी खासदार रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकार्यांकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे.

याबाबत वृत्त असे की, गेल्या काही दिवसांपासून तलाठी कर्मचार्यांचा संप सुरु असून केळी पिक विमा उतरविण्यासाठी जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्यांची धावपळ सुरू आहे. तलाठ्यांच्या संपामुळे शेतकर्यांना शेताचा७/१२ उतारा मिळण्यास अडचणी येत आहेत. केळी पिक विमा उतरविण्याची मुदत संपण्यात असुन, शेताच्याउतार्या अभावी शेतकरी केळी पिक विमा लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. आधीच अवकाळी पाऊस व जोरदार वादळाचे संकट असुन, अशा परिस्थितीत शेतकर्यांचे नुकसान होऊ नये याबाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी निवेदनात म्हटले.तरी सदर बाबींचा विचार करून शेतकर्यांना केळी पिक विमा उतरविण्यासाठी शेताचा७/१२ उतारा मिळणे बाबत, पर्यायी व्यवस्था होणेसाठी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरून तात्काळ कार्यवाही करावी याबाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी सूचना केल्या आहेत.




