राज्यात महायुतीने २२० जागा जिंकण्याचा निर्धार करा – चंद्रकांत पाटील

18 07 2019 chandrakant patil cong 19410435

मुंबई, वृत्तसंस्था | आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने २२० जागा जिंकल्याच पाहिजे, तसा निर्धार करा आणि कामाला लागा, असे आवाहन भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (दि.२१) केले. मुंबईत आयोजित पक्षाच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

 

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत जनतेने भरभरून आशीर्वाद दिले आहेत, आता पुन्हा एकदा आपल्याला जनतेकडे त्यांचे असेच भरभरुन आशीर्वाद मिळवण्यासाठी जायचे आहे. आगामी निवडणुकीत राज्यातील जनता आपल्या पाठिमागे नक्कीच ठामपणे उभी राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

युतीचा निर्णय भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य वेळी जाहीर करतील. तो निर्णय आपण त्यांच्यावर सोपवला पाहिजे. पण आपण सर्वांनी सर्व शक्तीनिशी कामाला लागले पाहिजे, असेही ते म्हणाले. गेल्या ७० वर्षात काँग्रेसला जे जमले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले आहे. रेल्वेमधील शौचालये बायोटॉयलेटयुक्त करुन पंतप्रधान नरेन्द्र मोदींनी मोठी क्रांती घडवली. वारीला निर्मलवारी बनवण्यासाठी स्वच्छ वारी निर्मल वारी मोहीम, वारकऱ्यांना पाच लाख रेनकोट देऊन त्यांची मोठी सोय केली आहे. ईव्हीएमवर शंका उपस्थित करणाऱ्यांनी बारामतीत सुप्रिया सुळे कशा विजयी झाल्या ?, याचाही विचार करावा, अशी कोपरखळी त्यांनी मारली.

Protected Content