जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बनावट कागदपत्रे आणि तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी करून शासनाची ६ लाख २३ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. इकरा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात २२ जानेवारी रोजी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंजुमन-ए-तालिमुल मुस्लेमीन संस्थेचे उपाध्यक्ष सय्यद चाँद कासार यांनी पदाचा दुरुपयोग करून आपला मुलगा सय्यद अमरुल्लाह याला २०१८ मध्ये शिक्षक म्हणून बेकायदेशीरपणे नियुक्त केले. या नियुक्तीचा प्रस्ताव प्रलंबित असताना, संशयितांनी संगनमत करून शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट सही असलेला आदेश तयार केला. या बनावट आदेशाद्वारे विनाअनुदानित पदावरून अनुदानित तत्त्वावर मान्यता मिळवून ‘शालार्थ’ प्रणालीत नाव नोंदवले आणि शासनाकडून ६ लाख २३ हजार ९७० रुपयांचे थकीत वेतन लाटले.

डॉ. सालार यांनी माहिती अधिकारात कागदपत्रे काढली असता, शिक्षणाधिकारी कार्यालयाने असा कोणताही आदेश दिला नसल्याचे स्पष्ट झाले. संशयितांनी औरंगाबाद खंडपीठातही बनावट कागदपत्रे सादर करून न्यायालयाची दिशाभूल केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात उपशिक्षक सय्यद अमरुल्लाह कासार, उपाध्यक्ष सय्यद चाँद कासार, निवृत्त मुख्याध्यापक शेख नईमोद्दीन, जिल्हा परिषदेचे वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र चौधरी आणि उपशिक्षक शेख जहीर अशा पाच जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली असून, यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.



