Home आरोग्य जळगावात तिरळेपणा उपचारासाठी मोठे नेत्रशिबिर; ३ ते ५ एप्रिल मोफत शस्त्रक्रिया

जळगावात तिरळेपणा उपचारासाठी मोठे नेत्रशिबिर; ३ ते ५ एप्रिल मोफत शस्त्रक्रिया


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तिरळेपणा (स्क्विंट) आणि संबंधित नेत्रविकारांवर उपचारासाठी जळगावात प्रथमच मोठ्या प्रमाणावर मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ३, ४ आणि ५ एप्रिलदरम्यान होणाऱ्या या विशेष शिबिरामुळे आता रुग्णांना मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही, तर जळगावातच तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळणार आहेत. हे शिबिर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली तिरळेपणा, पडलेली पापणी (Ptosis) यांसारख्या नेत्रसमस्यांवर तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सुमारे ३५ वर्षांचा अनुभव आणि हजारो यशस्वी शस्त्रक्रियांचा ठेवा असलेल्या तज्ज्ञांच्या उपस्थितीमुळे रुग्णांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे. विशेष म्हणजे, तपासणी आणि शस्त्रक्रिया पुण्यातील अनुभवी डॉक्टरांच्या टीमकडूनच केली जाणार आहे.

या उपक्रमात सुमारे २० तज्ञ डॉक्टरांची टीम सहभागी होणार असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. “तिरळेपणा मुक्त जळगाव जिल्हा” या संकल्पनेतून हे शिबिर आयोजित करण्यात आले असून जास्तीत जास्त गरजू रुग्णांना या सेवांचा लाभ मिळावा, हा आयोजकांचा उद्देश आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे या शिबिरासाठी केवळ १०० रुग्णांचीच नोंदणी मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्वरीत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तिरळेपणा ही लाज वाटण्याची बाब नसून त्यावर प्रभावी आणि सुरक्षित उपचार उपलब्ध आहेत, हा संदेशही या उपक्रमातून देण्यात येत आहे.

जळगावातील नागरिकांसाठी हे शिबिर मोठा दिलासा देणारे ठरणार असून, वेळेत उपचार घेतल्यास दृष्टी सुधारण्याबरोबरच व्यक्तीचा आत्मविश्वास वाढण्यासही मोठी मदत होणार आहे. अधिक माहितीसाठी ७०२८३०३४२३ आणि ९१७५८३००७६ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Protected Content

Play sound