Home राजकीय पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात मोठी कारवाई! तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित

पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात मोठी कारवाई! तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित


 पुणेलाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमीडिया होल्डिंग्स एलएलपी’ या कंपनीच्या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली असून, या प्रकरणात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. पुणे तालुक्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे या प्रकरणात आणखी गंभीर उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेतील चर्चेत मोठा आरोप करत म्हटले की, १८०४ कोटी रुपयांच्या बाजारभावाची जमीन फक्त ३०० कोटी रुपयांना विकत घेण्यात आली आहे. या व्यवहारात गंभीर अनियमितता झाली असून, सरकारी महसुलाचे मोठे नुकसान झाले आहे. या आरोपानंतर विरोधी पक्षांनी सरकारकडे चौकशीची मागणी केली होती.

यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेतली आणि सखोल चौकशीचे आदेश दिले. त्यांनी सांगितले की, “महसूल विभाग, लँड रेकॉर्ड आणि आयजीआर यांच्याकडून या प्रकरणाची सर्व माहिती मागवण्यात आली आहे. प्राथमिक तपासात गंभीर बाबी समोर आल्या असून, त्यानुसार योग्य ती कारवाई होणार आहे.” त्यांच्या वक्तव्यानंतर प्रशासन अॅक्शनमोडवर आले आणि तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन करण्यात आले.

या प्रकरणी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात महसूल विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही संशय निर्माण झाला असून, आणखी काही अधिकाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात ‘व्यवस्थेतील बडे अधिकारी सक्रिय होते’ अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आतापर्यंत माझ्याकडे कोणतीही अधिकृत तक्रार आलेली नाही. दमानिया यांचा मला फोन आला असून, ते मंगळवारी औपचारिक तक्रार दाखल करतील. त्यानंतर उद्योग विभागाकडून या व्यवहाराची तपासणी होईल. जर अधिकाऱ्यांनी काही गडबड केली असेल, तर निश्चितच कठोर कारवाई करण्यात येईल.”

या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात हलचल माजवली आहे. अजित पवार यांच्या पुत्राशी संबंधित असल्याने विरोधकांनी या विषयावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या चौकशी आदेशांनंतर आता या प्रकरणाचा पुढील तपास निर्णायक टप्प्यात जाणार आहे.

सारांश:


Protected Content

Play sound