Home क्राईम वरणगाव पोलिसांची मोठी कारवाई; डीपी चोरी करणारे सहा जण रंगेहाथ पकडले

वरणगाव पोलिसांची मोठी कारवाई; डीपी चोरी करणारे सहा जण रंगेहाथ पकडले


वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या विद्युत रोहित्र (डीपी) चोरीच्या घटनांवर पोलिसांनी निर्णायक कारवाई करत सहा संशयितांना अटक केली आहे. गस्तीदरम्यान संशयास्पद बोलेरो वाहनाचा पाठलाग करून ही कारवाई करण्यात आली असून, या धाडसी ऑपरेशनबद्दल पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

पोलिसांकडे मागील काही दिवसांपासून शेतशिवारातील विद्युत रोहित्र चोरीच्या तक्रारी येत होत्या. त्यानुसार बुधवारी (ता. १८) मध्यरात्री सुमारास पिंपळगाव परिसरात गस्त घालत असताना वरणगाव-नागेश्वर मंदिराजवळ एक बोलेरो मालवाहू वाहन (क्रमांक एमएच १९ सी वाय १९७४) संशयास्पदरीत्या फिरताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला.

त्यानंतर गस्तीवरील पोलिसांनी तत्काळ वाहनाचा पाठलाग सुरू केला आणि मुक्ताईनगर येथे असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल यांना माहिती दिली. त्यांनी तत्परता दाखवत बोदवड मार्गावरून पुढे जाऊन संशयित वाहन अडवले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचा विद्युत रोहित्र (डीपी) आढळून आला. तसेच वाहनासह एकूण सुमारे ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणात अर्जुन सोनवणे, रविंद्र भिल, धीरज जोहरे, आर. बाजशहा (सर्व रा. पिंपळगाव खुर्द) तसेच इमरान शहा (रा. आरएन कॉलनी, भुसावळ) यांच्यासह एकूण सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गस्तीवरील पोलिस कर्मचारी साहेबराव कोळी, फिरोज पठाण, लतीफ तडवी, सुकराम सावकारे आणि गोपीचंद सोनवणे यांनीही या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या तत्परतेमुळे मोठी चोरी उघडकीस आली असून, स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.


Protected Content

Play sound