Home क्राईम जळगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुणाला अटक

जळगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुणाला अटक


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, स्थानिक गुन्हे शाखेने एका २१ वर्षीय युवकाला गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. मोहम्मद साद अय्युब खान (रा. शाहूनगर, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून शस्त्रांसह एक मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी संपूर्ण जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याच आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कार्यरत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना १० फेब्रुवारी २०२६ रोजी गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. उस्मानिया पार्क आणि शिवाजीनगर परिसरात एक तरुण मोटरसायकलवर बेकायदेशीर शस्त्र घेऊन फिरत असल्याचे समजताच, पोलिसांनी या भागात रात्रीच्या वेळी अत्यंत गोपनीयरीत्या सापळा रचला.

संशयित मोहम्मद साद हा परिसरात दिसताच पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त केलेले शस्त्र त्याने कोठून आणले आणि त्याचा नेमका उद्देश काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते,  उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहा फोजदार अतुल वंजारी, पोहेकी विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बारोस्कर, किलेश सोनवणे, किशोर पाटील, रविंद्र कापडणे यांच्या पथकाने केली आहे. पोलीस हवालदार सुनील पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Protected Content

Play sound