पिंपरखेड येथे मका व हरभरा पीक प्रात्यक्षिक; नॅनो युरिया वापरावर मार्गदर्शन

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासन कृषी विभाग व इफको सहकारी कंपनीच्या संयुक्त विद्यमाने पिंपरखेड येथे रवींद्र सिताराम पाटील यांच्या शेतावर मका व हरभरा पीक प्रात्यक्षिक शेती दिन आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाला पिंपरखेड सरपंच अरुण बडगुजर, उपसरपंच राजू कोळी, ग्रामपंचायत सदस्य, मंडळ कृषी अधिकारी प्रताप खाडे, कृषी पर्यवेक्षक सुहास भालेराव, कृषी सहाय्यक सचिन पाटील, कृषी सहाय्यक सुखदेव गिरी, इफकोचे क्षेत्रीय अधिकारी केशव शिंदे, निलेश सोनवणे आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इफकोचे क्षेत्रीय अधिकारी केशव शिंदे यांनी नॅनो युरिया व नॅनो डीएपी खताच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, देशात २०२१ मध्ये ६६१ लाख टन खत वापरले गेले, त्यापैकी ५३% म्हणजेच ३५० लाख टन युरिया होता. युरियाचा अतिरिक्त वापर जमिनीच्या सुपीकतेवर आणि हवामानावर विपरीत परिणाम करतो. नॅनो युरिया व नॅनो डीएपी हे पर्यायी खत पर्यावरणपूरक असून पिकांसाठी उपयुक्त आहे. यामध्ये कोणतेही घटक वातावरणातील पाणी, हवा किंवा जमिनीत मिसळत नाहीत, त्यामुळे प्रदूषण होत नाही. अधिकाधिक शेतकऱ्यांनी नॅनो तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती उत्पादन वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले.

ॲग्रिस्टॅक योजना व महाडीबीटी पोर्टलचा लाभ घ्या – कृषी विभागाचे आवाहन
मंडळ कृषी अधिकारी प्रताप खाडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक योजनेची संपूर्ण माहिती दिली आणि गाव १०० टक्के या योजनेत सहभागी करण्याचे आवाहन केले. पिंपरखेड कृषी सहाय्यक सुखदेव गिरी यांनी विविध कृषी योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखदेव गिरी यांनी, तर आभार प्रदर्शन सचिन पाटील यांनी केले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती व पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाविषयी महत्त्वाची माहिती मिळाली.

Protected Content