पटणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । लोकप्रिय लोकगायिका मैथिली ठाकूर यांना अखेर बिहार विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली असून, भाजपने त्यांच्या अलीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपच्या दुसऱ्या उमेदवार यादीत त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला असून, यामध्ये एकूण १२ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यादीत नव्या चेहऱ्यांना संधी देतानाच, काही दिग्गजांची तिकिटंही कापण्यात आली आहेत.
भाजपकडून जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीनुसार मैथिली ठाकूर या दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी नुकताच पाटणा येथे भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला होता. पक्षप्रवेशानंतर त्यांच्या उमेदवारीविषयी चर्चांना उधाण आले होते आणि आता ती अधिकृत झाली आहे. लोकसंगीतातील त्यांच्या लोकप्रियतेमुळे पक्षाला ग्रामीण मतदारांमध्ये मजबूत पकड मिळवण्याची आशा आहे.

दुसऱ्या यादीतील आणखी एक महत्त्वाचा चेहरा म्हणजे बक्सरमधून लढणारे आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा. प्रशासनातील अनुभव असलेल्या मिश्रा यांना थेट राजकारणात आणत भाजपने व्यावसायिक आणि सुसंस्कृत प्रतिमेचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.
याच यादीत काही दिग्गज नेत्यांची तिकिटं कापण्यात आली आहेत. मुजफ्फरपूरमधून सुरेश शर्मा यांना वगळून रंजन कुमार यांना तिकिट देण्यात आले आहे. तसेच गोपालगंजमधून कुसुम देवी यांना डावलून सुभाष सिंह यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बाढ मतदारसंघातही मोठा फेरबदल करत ज्ञानेंद्र सिंह यांना बाजूला सारण्यात आलं असून सियाराम सिंह यांना संधी देण्यात आली आहे.
या यादीने भाजपने स्पष्ट संकेत दिले आहेत की, नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देत पक्षात ताजं रक्त भरण्यावर भर दिला जाणार आहे. नवमतदार आणि तरुणांमध्ये प्रभावी चेहऱ्यांची निवड करून पक्षाने एकप्रकारे निवडणूक रणनीतीचं पुनर्रचनं केलं आहे.
एकूणच, मैथिली ठाकूर यांच्यासारख्या सांस्कृतिक क्षेत्रातील लोकप्रिय चेहऱ्याची निवड, तसेच प्रशासनातील अधिकारी आणि नवोदित कार्यकर्त्यांना संधी देत भाजपने दुसऱ्या यादीतून स्पष्ट संदेश दिला आहे की, अनुभवाबरोबरच नविन उर्जेवर पक्ष विश्वास ठेवतो आहे. या यादीमुळे अनेक पारंपरिक समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता आहे.



