संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक

बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. हत्येला २५ दिवस होऊनही अद्याप मारेक-यांना अटक झालेली नव्हती. यानंतर आज सकाळी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे हत्या झाल्यानंतर फरार झाले होते. त्यांना पकडण्यासाठी सीआयडीने प्रसिद्धिपत्रक जारी करत त्यांना फरार घोषित केले होते. त्यानंतर आज दोघांना अटक झाली आहे. तर तिसरा आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. घुले आणि सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाईल. तसेच आरोपींना मदत करणा-या डॉ. संभाजी वायभसेंनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डॉ. वायभसे यांनी आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली होती, अशी माहिती समोर येत आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एकूण सात आरोपी आहेत. विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार या चार आरोपींना याआधीच अटक करण्यात आली होती. यानंतर आज सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे.मस्साजोग गावातील अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्प असलेल्या परिसरात ६ डिसेंबर रोजी सुदर्शन घुले आणि त्याच्या सहका-यांनी राडा घातला होता.

अवादा कंपनीच्या कार्यालयात सुरक्षा रक्षक असलेल्या मस्साजोग गावातील युवकाला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याचाच राग मनात धरून केज तालुक्यातील टाकळी गावात राहणा-या सुदर्शन घुले आणि त्याच्या सहका-यांनी मिळून संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली. सुदर्शन घुले (वय २६) हा ऊसतोड कामगारांचा मुकादम म्हणून काम करतो. त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. यामध्ये मारहाण आणि अपहरणाच्या गुन्ह्याचा समावेश आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी करण्यात येत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तशी मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी स्वत: अ‍ॅड. निकम यांच्याशी संपर्क साधला. यासंदर्भात अभ्यास करून दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे अ‍ॅड. निकम यांनी सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Protected Content