Home Cities जळगाव प्रभाग ११ मध्ये महायुतीचे शक्तीप्रदर्शन : डॉ. अमृता सोनवणेंच्या प्रचाराला हरीविठ्ठल नगरात...

प्रभाग ११ मध्ये महायुतीचे शक्तीप्रदर्शन : डॉ. अमृता सोनवणेंच्या प्रचाराला हरीविठ्ठल नगरात प्रचंड प्रतिसाद


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने जळगाव शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे. प्रभाग क्रमांक ११ मध्ये महायुतीच्या उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला असून, हरीविठ्ठल नगर परिसरात काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीत जनसागराचा ओघ पाहायला मिळाला.

भक्तीमय वातावरणात प्रचाराचा वाढला जोर :
प्रचाराच्या सुरुवातीला महायुतीच्या उमेदवारांनी स्थानिक प्रसिद्ध हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि विजयाचा संकल्प करत रॅलीला सुरुवात केली. महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि मित्रपक्षांच्या उमेदवार डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे, सिंधूताई कोल्हे, ललित कोल्हे आणि संतोष पाटील यांच्या प्रचारासाठी ही रॅली काढण्यात आली होती.

महिलांचा प्रतिसाद आणि भावनिक नाते :
हरीविठ्ठल नगर हा लोकसंख्येने मोठा असलेला भाग असल्याने येथे रॅलीचे स्वागत अत्यंत उत्साहात करण्यात आले. ठिकठिकाणी महिलांनी घराबाहेर येऊन उमेदवारांचे औक्षण केले आणि फुलांची उधळण केली. विशेषतः डॉ. अमृता सोनवणे यांनी घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. त्यांनी वृद्ध महिलांच्या तब्येतीची विचारपूस करत आणि तरुणांशी संवाद साधत मतदारांशी थेट नातं जोडलं. अनेक ठिकाणी महिलांनी त्यांना विजयाचा आशीर्वाद देऊन पेढे भरवले, ज्यामुळे रॅलीत एक भावनिक वातावरण निर्माण झाले होते.

तिसरी पिढी मैदानात : राजकारणाचे बाळकडू :
डॉ. अमृता सोनवणे या आमदार चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या कन्या आहेत. कुटुंबातील ही तिसरी पिढी आता सक्रिय राजकारणात उतरल्याने मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी उत्सुकता आहे. डॉ. अमृता यांना लहानपणापासूनच राजकारणाचे आणि समाजसेवेचे बाळकडू मिळाले असल्याने, त्यांच्या संवादशैलीत आणि कार्यपद्धतीत एक वेगळीच परिपक्वता जाणवत आहे.

राजकीय वळण: अपक्ष उमेदवाराचा पाठिंबा :
या रॅलीदरम्यान प्रभागात एक मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली. डॉ. अमृता सोनवणे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवार अरुणा सुहास कोळी यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. इतकेच नव्हे तर, त्यांनी प्रत्यक्ष रॅलीत सहभागी होऊन महायुतीच्या प्रचारात सहभाग घेतला. या पाठिंब्यामुळे डॉ. अमृता सोनवणे यांचे पारडे अधिक जड झाले असून, विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे. डॉ. सोनवणे यांनी अरुणा कोळी यांचे आभार मानून त्यांचे स्वागत केले.


Protected Content

Play sound