मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जोरदार तयारी सुरू केली असून महायुतीच्या संयुक्त मेळाव्यास २० ऑगस्टला कोल्हापूरपासून प्रारंभ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार असून संवाद यात्रांनाही सुरुवात होईल. राज्यात महायुतीचे ९ मोठे मेळावे आयोजित करण्यात येणार असून निवडणूक प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे.
महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जनतेपर्यंत पोचण्यासाठी शासकीय पातळीवर आणि पक्षपातळीवर मेळाव्यांचे नियोजन केले आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’, शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज यासह अनेक योजना व महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत. ते जनतेपर्यंत पोचविण्यासाठी शासकीय पातळीवरही मोठी मोहीम हाती घेण्यात आली असून मंगळवारी जळगाव येथे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ मेळावा झाला.
या धर्तीवर राज्यात प्रत्येक महसुली विभागात एकूण किमान पाच मोठे संयुक्त मेळावे घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पक्षपातळीवरूनही महायुतीचे संयुक्त मेळावे आयोजित करण्यात येणार असून त्यास शिंदे, फडणवीस व पवार उपस्थित राहतील. नागपूर, अमरावती, जळगाव, नाशिक, संभाजीनगर, लातूर, महाड, ठाणे व मुंबईत हे मेळावे होणार आहेत. ‘एकजूट महाराष्ट्राच्या अभिमानाची, विकासाची, कल्याणाची’ अशी मेळाव्याची संकल्पना (टॅगलाईन) ठरविण्यात आली आहे. कोल्हापूर येथे पहिला संयुक्त मेळावा होणार असून महालक्ष्मीचे दर्शन घेऊन शिंदे, फडणवीस व पवार हे मेळाव्यास येतील.असे महायुतीचे मुख्य समन्वयक आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. या मेळाव्यांसाठी केंद्रीय नेते, मंत्री, महायुतीचे खासदार, आमदार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी या मेळाव्यास उपस्थित राहतील.