
एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जसजशी जवळ येत आहे, तसतशी एरंडोलमधील राजकीय रंगत वाढू लागली आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार मा. अमोलदादा पाटील यांनी प्रभाग क्रमांक १, ९ व १० मध्ये जोरदार प्रचार रॅली काढून माय-बाप जनतेच्या भेटीगाठी घेत त्यांचे शुभाशिर्वाद घेतले.

जनसंपर्कादरम्यान आ. अमोल पाटील यांनी ओम नगर व भोई गल्ली परिसरातील श्रीराम मंदिराजवळ कॉर्नर सभेने शहरवासियांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, माजी जि.प. उपाध्यक्ष ज्ञानेश्वरनाना आमले, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. मनोजभाऊ पाटील (प्रभाग क्र. ५ ब चे उमेदवार), धरणगाव बाजार समितीचे माजी सभापती शालिक गायकवाड, तालुकाप्रमुख रविभाऊ जाधव, माजी नगराध्यक्ष राजूआबा चौधरी, किशोर निंबाळकर तसेच महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार अमोल पाटील यांनी यावेळी एरंडोल शहराच्या सर्वांगिण विकासासाठी २०० हून अधिक कोटींचा निधी आणण्यात यश मिळविल्याचे स्पष्ट केले. “केवळ कामे करायची म्हणून कामे केली नाहीत, तर ‘पुस्तकांचा बगीचा’सारख्या नवनवीन संकल्पना राबविल्या, ज्यामुळे एरंडोलचे नाव राज्यभर गाजले,” असे ते म्हणाले.
डॉ. नरेंद्र ठाकूर (नगराध्यक्ष उमेदवार), कल्पनाताई मनोज पाटील (प्रभाग क्र. १ अ), अभिजित राजेंद्र पाटील (प्रभाग क्र. १ ब), नितेश कैलास चौधरी (प्रभाग क्र. ९ ब), मनकरनाबाई चैतराम चौधरी (प्रभाग क्र. १० अ) आणि नय्युम खान दलशेर खान (प्रभाग क्र. १० ब) या सर्व महायुतीच्या उमेदवारांना मतदारांनी मतदानरूपी शुभाशिर्वाद देऊन प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन आमदार पाटील यांनी शेवटी केले.



