
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘रिव्हॅम्पड डिस्ट्रिब्युशन सेक्टर स्कीम’ (RDSS) अंतर्गत जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि तांत्रिक अनियमितता समोर आली आहे. सुमारे ७०० कोटी रुपयांच्या या योजनेत नियमांचे उल्लंघन करून निकृष्ट दर्जाची कामे केली जात असल्याचा गंभीर आरोप मुक्ताईनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल बाबुराव बोदडे यांनी केला असून, या प्रकरणी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

तांत्रिक निकष धाब्यावर:
तक्रारीनुसार, जिल्ह्यामध्ये नवीन विद्युत खांब उभारताना शासनमान्य निकषांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे. नियमानुसार प्रत्येक खांबासाठी ६ फूट खोल आणि ३ फूट रुंद खड्डा घेऊन त्याचे सिमेंट, वाळू व गिट्टीद्वारे पूर्ण कॉंक्रिटीकरण करणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी केवळ ४ ते ५ फूट खोदकाम करून वरून माती टाकून काम उरकले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ही कामे स्थानिक मजुरांकडून करून घेतली जात असून, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी महावितरणचा कोणताही जबाबदार अधिकारी किंवा ठेकेदाराचा प्रतिनिधी उपस्थित राहत नाही.
अधिकारी-ठेकेदार संगनमताचा आरोप:
“ठेकेदाराला नफा आणि अधिकाऱ्यांना वाटा” अशा स्वरूपात ही योजना राबवली जात असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. देखरेखीच्या अभावामुळे भविष्यात पावसाळ्यात किंवा वादळात हे खांब कोसळून मोठी जीवित वा वित्तहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही अनेक योजनांमध्ये अशाच प्रकारच्या त्रुटी राहिल्याने त्याचा त्रास आजही शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
मागणी आणि इशारा:
या संपूर्ण गैरप्रकाराची तांत्रिक व आर्थिक विशेष चौकशी (Special Audit) करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करून संबंधित ठेकेदाराला ‘ब्लॅकलिस्ट’ करावे, असेही तक्रारीत नमूद केले आहे. जर यावर त्वरित कारवाई झाली नाही, तर उच्च न्यायालयात धाव घेण्याचा आणि लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अमोल बोदडे यांनी दिला आहे. ७०० कोटींच्या या योजनेतील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.



