जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील वीजविषयक सेवा अधिक सक्षम व कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण विभागाची एकत्रित आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सद्यस्थिती, प्रलंबित कामकाज तसेच अंमलबजावणीतील अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत वीजपुरवठा, देखभाल-दुरुस्ती, नवीन वीजजोडण्या, ग्राहक सेवा आणि योजनेनिहाय प्रगतीचा सर्वंकष व सखोल आढावा घेण्यात आला. विभागीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रलंबित कामांची माहिती सादर केली असून, ती कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

नागरिकांना सुरळीत, सुरक्षित व दर्जेदार वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी वेळबद्ध कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील वीजविषयक सेवा अधिक पारदर्शक, सक्षम व कार्यक्षम करण्यावर विशेष भर देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. बैठकीस महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



