Home प्रशासन महावितरण एक्शन मोडवर : शंभर टक्के थकबाकी वसुलीचे लक्ष्य

महावितरण एक्शन मोडवर : शंभर टक्के थकबाकी वसुलीचे लक्ष्य


बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अकोला परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक तसेच इतर सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांकडून चालू वीजबिलांची १०० टक्के वसूली करण्यासह थकीत वीजबिले पूर्णतः वसूल करण्याचा निर्धार महावितरणने केला आहे. जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत चालू वीजबिलांची शंभर टक्के वसूली, तर एप्रिल ते डिसेंबर २०२५ या कालावधीतील २३४ कोटी रुपयांची थकबाकी वसुली हे प्रमुख उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासोबतच ग्राहकांच्या प्रलंबित तक्रारी निकाली काढून वीज सेवेची गुणवत्ता वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी ‘मिशन ९० दिवस’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून वरिष्ठ अधिकारी ते शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांवर ठोस जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचे सांगितले. कामात दिरंगाई, हयगय किंवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

वीजबिलाची वसूली ही केवळ आर्थिक बाब नसून त्यावरच महावितरणचे अस्तित्व आणि सेवा अवलंबून असल्याचे नमूद करत थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. शासकीय आस्थापना, सार्वजनिक सेवा संस्था, उच्चदाब वर्गवारीतील ग्राहक तसेच मोठ्या थकबाकीदारांकडून वीजबिल वसुलीसाठी अधीक्षक अभियंता ते तंत्रज्ञांपर्यंत सर्वांना ठोस उद्दिष्टे ठरवून देण्यात आली आहेत.

वीज सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तांत्रिक पातळीवरही महत्त्वाची पावले उचलण्यात येणार आहेत. वीज वाहिन्यांमधील तांत्रिक बिघाड कमी करणे, ट्रान्सफॉर्मर फेल्युअरचे प्रमाण घटवणे, लो-व्होल्टेज व वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या तक्रारी तातडीने निकाली काढणे, तसेच मीटरिंग, बिलिंग आणि कलेक्शन प्रणाली अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वितरण हानी कमी करण्यासाठी पुढील तीन महिने वीज चोरीविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. दंडात्मक कारवाईनंतरही वीजचोरीचे बिल न भरणाऱ्या ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून, मोहिमेला विरोध करणाऱ्या भागात पोलिसांच्या मदतीने कडक कारवाई केली जाणार आहे.

वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने वीजपुरवठ्यासह सर्व प्रकारच्या ग्राहक तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘मिशन ९० दिवस’ उपक्रमांतर्गत सध्या प्रलंबित असलेल्या सर्व तक्रारी वेळेत व प्रभावीपणे निकाली काढण्याचे निर्देश मुख्य अभियंता यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.


Protected Content

Play sound